जयराम रमेश यांचा आक्रोश


कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश हे राहुल गांधी यांचे अतीशय निकटचे सहकारी समजले जातात. नेमकेपणाने सांगायचे झाले तर राहुल गांधी यांनी कोणत्या वेळी कोणते भाषण करायचे हे जयराम रमेश यांनी लिहून दिलेले असते. इतके त्यांचे स्थान कॉंग्रेसमध्ये वरच्या पातळीवरचे आहे. आजवर कॉंग्रेसच्या दुःस्थितीबद्दल बर्‍याच नेत्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. राहुल गांधी यांचे नेतृत्व पक्षाला पुरेशी उभारी देण्यास उपयोगी पडणारी नाही हे अनेकांनीय दाखवून दिलेले आहे. परंतु अशा प्रकारचे प्रतिपादन जयराम रमेश यांनी करावे याला मोठे महत्त्व आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या नेतृत्वात मोठे बदल केले जावेत असे सूचित केले आहे.

अशा प्रकारचे अनेक इशारे दिले जाऊनसुध्दा राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाला पुढे नेण्याचा बहुसंख्य नेत्यांचा निर्धार आहे. त्यामुळे जयराम रमेश यांनी प्रामाणिकपणे केलेले हे प्रतिपादन निदान कॉंग्रेसमध्ये तरी अरण्यरुदन ठरणार आहे. किंबहुना आजच काही कॉंग्रेस नेत्यांनी जयराम रमेश यांच्यावर टीका केली असून ते म्हणतात त्याप्रमाणे पक्षाच्या नेतृत्वात कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही असे प्रतिपादन केले आहे. जयराम रमेश यांनी काहीही म्हटलेले असो किंवा त्यांच्या विरोधकांनी काहीही सूचित केलेले असो पण पक्षाला सध्याचे नेतृत्व उभारी देऊ शकणार नाही हे लोकांना दिसत आहे आणि ते नाकारण्यात प्रामाणिकपणा नाही.

केवळ राहुल गांधीच नव्हेतर सोनिया गांधी यासुध्दा पक्षाला फार पुढे नेऊ शकणार नाहीत हे वारंवार स्पष्ट होत आलेले आहे. काल चले जाव चळवळीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत चर्चा झाली. त्या चर्चेत सोनिया गांधी यांना देशाला नवी दिशा देणारा संदेश देता आला असता काही तरी सकारात्मक बोलून लोकांच्या अपेक्षा उंचावता आल्या असत्या. परंतु त्यांनी पुन्हा एकदा, काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी चले जावच्या चळवळीत ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला होता. याच आरोपाची पुनरुक्ती केली. अशा प्रकारचा तद्दन बनावट आरोप करून संघ आणि भाजपाला खिजवण्याची संधी कॉंग्रेस आणि भाजपेतर पक्ष नेहमीच घेत आलेले आहेत. सोनिया गांधी यांना हाच वारंवार घासून गुळगुळीत झालेला आरोप न करता देशाच्या विकासाची नवी दिशा दाखवणारे आणि त्या मोठ्या द्रष्ट्या आहेत हे सिध्द करणारे भाषण नक्कीच करता आले असते. परंतु ही संधी अशा चांगल्या कामासाठी वापरण्याइतकी लघूदृष्टीसुध्दा त्यांच्याकडे नाही. जयराम रमेश यांचा आक्रोश खराच आहे.

Leave a Comment