
नवी दिल्ली – टाटा समूह सरकारी ‘पांढरा हत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘ईटी नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. एअर इंडिया टाटा समूहाने विकत घेतल्यास या कंपनीला पुन्हा एकदा टाटांचे पाठबळ मिळणार आहे. एअर इंडियाचे १९५३ मध्ये राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी ही कंपनी टाटा समुहाच्याच मालकीची होती.
‘एअर इंडिया’ला विकत घेणार टाटा समूह
सरकारसोबत टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अनौपचारिक चर्चा सुरु केल्याचे वृत्त ‘ईटी नाऊ’ने दिले आहे. टाटा समुहाचे एअर इंडियामध्ये ५१ टक्के शेअर्स असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाच्या वास्तवाची जाणीव केंद्र सरकारलाही असून सरकारही टाटा समुहाने दिलेल्या प्रस्तावावर अनुकूल असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज असून याशिवाय ४ हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे. एअर इंडिया गेल्या १० वर्षांपासून तोट्यात असून अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनीदेखील एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते.
