
नवी दिल्ली – भारत पहिल्यांदाच पुढील महिन्यात सर्वात शक्तीशाली रॉकेट अवकाशात सोडणार आहे. ४ टन वजनाचे संदेशवहन करणारे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असणार आहे. यामुळे संदेशवहन आणि संपर्क क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.
इस्रो सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटचे प्रक्षेपण जूनमध्ये करणार
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण जागतिक स्तरावरील कोट्यवधींची अंतराळ बाजारपेठ आणि इतर देशांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी करणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोच्या शिरपेचात जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. यासोबतच भारत अंतराळ क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकेल.
पुढील महिन्यात जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण करण्यात येणार असून यासाठीची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथे यासाठीची संपूर्ण सामग्री असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली. सध्या रॉकेटच्या सुट्या भागांची जोडणी सुरु असून विविध विभागांमध्ये हे काम सुरु असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात रॉकेटचे प्रक्षेपण केले जाणार आहे, असेदेखील कुमार यांनी पुढे बोलताना म्हटले.
दूरसंचार आणि संपर्क क्षेत्रात जीएसएलव्ही मार्क ३ च्या प्रक्षेपणामुळे मोठे बदल होतील, असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. जीएसएलव्ही मार्क ३ हे भारताचे सर्वाधिक शक्तीशाली प्रक्षेपक असणार आहे. २ टन जीएसएलव्ही मार्क २ या रॉकेटच्या माध्यमातून वजन नेले जाऊ शकते.
