कार धुणारा मुलगा चालवतो मुलांचे वृत्तपत्र


उपजीविकेसाठी दिवसभर कार धुणारा एक फेरीवाला मुलगा मुलांसाठी निघणारे वृत्तपत्र चालवत आहे. ही अजब व प्रेरणादायी घटना राजधानी दिल्लीतील.

शंभू असे या मुलाचे नाव आहे. केवळ 17 व्या वर्षी तो ‘बालकनामा’ या नावाच्या वृत्तपत्राचे संपादन करत आहे. हे वृत्तपत्र रस्त्यावरील मुले मिळवून चालवतात.

शंभू लोकांच्या मोटारी धुवून उपजीविका चालवतो. तसेच एका शिक्षण केंद्रात जाऊन शिक्षण घेतो. तो मूळचा बिहारमधील बिरौल या गावातील असून वयाच्या 9 व्या वर्षी तो दिल्लीला आला होता. तेथे तो काकड्या विकण्याच्या व्यवसायात वडिलांना मदत करत असे.

गावी असताना तो सरकारी शाळेत जात असे, मात्र तेथे मला काहीच शिकायला मिळाले नाही, असे तो सांगतो. दिल्लीत आल्यानंतर तो वाचायला-लिहायला शिकला आणि त्याला पत्रकारितेची गोडी लागली. याच केंद्रात त्याला ‘बालकनामा’विषयी माहिती कळाली.

“पूर्वी मला येथील लोक फक्त कार धुणारा मुलगा म्हणून ओळखत होते. मात्र बालकनामाची माहिती त्यांना कळल्यावर ते सगळे मला संपादक साहेब म्हणतात,” असे तो सांगतो.

या वृत्तपत्राची किंमत 5 रुपये असून त्याच्या 8000 प्रती छापल्या जातात. चेतना नावाची संस्था या वृत्तपत्राचा खर्च करते. व्हाटसअॅप व इमेलवरूनही या वृत्तपत्राच्या प्रती पाठवण्यात येतात. मुख्यतः रस्त्यावर राहणाऱ्या मुलांशी संबंधित बातम्या त्यात असतात.

Leave a Comment