
रत्नागिरी व देवगढ मधील जगप्रसिद्ध हापूस आंब्याला गुणवत्ता व दर्जा यांच्यासाठी नवी ओळख मिळाली आहे. या आंब्यांना जिओ इंडिकेशन म्हणजेच जीआय टॅग मिळाला आहे. कोणत्याही वस्तूचे मूळ स्थान व त्याची खासियत यासाठी हा टॅग दिला जातो. त्याला संबंधित वस्तूची भौगोलिक ओळख असे म्हटले जाते. आत्तापर्यंत ८७ कृषी उत्पादनांना हा टॅग मिळाला असून त्यातील २३ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत.
रत्नागिरी देवगड हापूसला भौगोलिक ओळख मिळाली
रत्नागिरी व देवगढ येथील हापूसला हा टॅग मिळाल्याचा फायदा शेतकरी व ग्राहक दोघांनाही होणार आहे. या टॅगमुळे या नावाने हे आंबे आता फक्त रत्नागिरी व देवगढ येथील अ्रांबा उत्पादकच विकू शकणार आहेत. अन्य कोणीही आंबे विक्री करताना रत्नागिरी वा देवगढ हापूस म्हणून ते विकू शकणार नाहीत. ग्राहकांना यामुळे असली हापूसचा स्वाद चाखता येईल तसेच आंबा विक्रीचे रजिस्टर्ड युजर्सच हे नाव वापरू शकतील. गेली साडेचार वर्षे केळशी आंबा उत्पादक तसेच देवगड आंबा उत्पादक असो. या टॅगसाठी संघर्ष करत होते. त्यासाठी देवगढचे अजित गोगटे यांनी मोठा लढा दिला व अखेर वाणिज्य मंत्रालयाने हा टॅग दिला असे समजते.
दुय्यम आंबे रत्नागिरी व देवगढ हापूसच्या नावावर विक्री केल्यामुळे होत असलेले मुळ उत्पादकांचे नुकसान आता होऊ शकणार नाही तसेच हे उत्पादक विविध देशांतही त्यांचे उत्पादन या टॅगखाली विकू शकणार आहेत.
