बेकिंग सोडा – गृहिणींसाठी वरदान ..


बेकिंग सोडा किंवा “सोडा–बाय–कार्ब” साधारणतः सर्वच गृहिणींच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणारा पदार्थ आहे. स्वयंपाक करत असताना पदार्थ चटकन शिजावा, किंवा भाज्यांचा हिरवा रंग टिकून राहावा, बेकिंग करत असताना, केक किंवा बिस्कीट सारखे पदार्थ चांगले फुगून यावेत, या आणि अश्याच अनेक कारणांसाठी बेकिंग सोडाचा वापर केला जातो. पण स्वयंपाकाव्यतिरिक्त, बेकिंग सोडा कितीतरी कामांकरिता वापरता येऊ शकतो. त्याबद्दल थोडेसे..

कपडे धुण्याच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा वापरल्यास कपडे मुलायम राहतात. त्याचबरोबर कपड्यांवर असलेला पिवळेपणा किंवा इतरही डाग असल्यास बेकिंग सोडाचा वापर करावा. पांढरे कपडे धुताना साबणचुरा आणि ब्लीच् च्या जोडीला बेकिंग सोडाही वापरला असता कपड्यांचा रंग अधिक उजळतो. शाई, फळांचे रस, किंवा इतर तेलकट पदार्थांमुळे कपड्यांवर पडलेले डाग बेकिंग सोडाच्या वापरामुळे नाहीसे होतात.

स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या बाबतीत गृहिणी दक्ष असतातच. ह्या सफाईच्या कामी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. माइक्रोवेव्ह ओव्हन किंवा conventional ओव्हन मध्ये अन्न शिजवतना अनेकदा सांडते, आणि त्याचा थर ओव्हन मध्ये जमून राहतो. अश्या वेळेला ओव्हनमध्ये गरम पाणी शिंपडून त्यावर बेकिंग सोडा भुरभुरावा. त्यानंतर थोड्याच वेळात ओव्हनमध्ये जमलेले थर सुटून येताना दिसतील. स्वयंपाकाची भांडीही अनेकदा काळी होतात किंवा अन्न शिजवताना भांड्याच्या तळाशी लागते. अश्या वेळी भांड्यांच्या सफाईकरिता बेकिंग सोडाचा वापर करावा. फ्रीजमध्ये अन्न साठवताना अनेक प्रकारचे गंध फ्रीज मध्ये येतात. त्यासाठी बकिंग सोडा एका छोट्या कपड्यात बांधून ती पुरचुंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजमध्ये अन्नामुळे येत असणारे गंध नाहीसे होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा घरच्या रोजच्या स्वच्छतेच्या कामीसुद्धा येतो. बाथरूम्स किटाणूरहित करण्याकरता, किंवा tiles वर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्याकरिता बेकिंग सोडा उपयोगाला येतो. कचऱ्याच्या टोपली मध्ये, किंवा बुटांमधून येणारा दुर्गंध, बेकिंग सोडा त्यामध्ये भुरभुरल्यामुळे नाहीसा होतो. घरामध्ये मुंग्या किंवा झुरळांचा प्रादुर्भाव झाल्यास बेकिंग सोडा आणि पिठीसाखर समप्रमाणात मिसळून भुरभुरल्यास मुंग्या आणि झुरळे नाहीशी होतात.

बेकिंग सोडा चा वापर काही आजारांमध्ये औषधासारखा केला जातो. अपचन, tonsils चा विकार, कांजिण्या झाल्यामुळे शरीराचा होत असणारा दाह, सांधेदुखी इत्यादी विकारांवर बेकिंग सोडा गुणकारी आहे. त्याचबरोबर दातांचा पिवळेपणा, तोंडातून येणारी दुर्गंधी यावरही बेकिंग सोडा गुणकारी आहे.

त्वचेची आणि केसांची निगा राखण्यास बेकिंग सोडा वापरता येऊ शकतो. बेकिंग सोडा चा वापर स्क्रब म्हणून केल्यास मुरुमे – पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. केसांमधील कोंडा कमी करण्यासाही बेकिंग सोडाचा वापर, गरम पाण्यामध्ये मिसळून करावा.

हिरव्या भाज्या शिजवताना त्यांचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. त्याचबरोबर फ्लॉवरचा पांढरा रंग टिकून राहण्याकरता तसेच त्याचा उग्र वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. कडधान्ये कित्येकदा प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यानंतरसुद्धा अपुरी शिजतात. अश्या वेळी त्यामध्ये बेकिंग सोडाचा वापर केल्यास कडधान्ये लवकर शिजतात.

बहुतेक करून सगळ्यांच्याच घरी सण – समारंभाच्या दिवशी चांदीची भांडी वापरली जातात. पण वापरण्याआधी ती चांदीची भांडी घासून चमकवणे हे ही एक मोठे काम असते. एका मोठ्या भांड्यामध्ये तळाशी aluminum foil लावावी. त्यावर, भांडी त्यात बुडतील इतके पाणी घालून त्यास उकळी आणावी. त्यामध्ये चांदीची भांडी घालून थोडा बेकिंग सोडा घालावा. थोड्याच वेळात चांदीची भांडी उजळलेली दिसतील. त्यानंतर भांडी गरम पाण्यातून काढून घेऊन नेहमीप्रमाणे धुऊन घ्यावीत.

Leave a Comment