जिओमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले

telecom
मुंबई- जिओ ४ जी डिजीटलची रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी घोषणा केल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले असून आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल आपले दर कमी करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या डाटा पॅकच्या दरांपेक्षा रिलायन्सने जिओसाठी ठेवलेले दर हे खूपच स्वस्त आहेत. रिलायन्सने केवळ ५० रुपयांमध्ये १ जीबी डाटा देण्याची घोषणा केली आहे, तर आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल यांचे दर पाचपट म्हणजेच १ जीबीसाठी २५० रुपये असे आहेत. तेव्हा या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी या कंपन्यांना आपले दर कमी करणे अत्यावश्यक होणार असल्याची चर्चा बाजारात आहे. या टेलिकॉम कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या स्पर्धेत टिकायचे असेल तर लवकरच दर कमी करण्याची घोषणा करावी लागणार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. अद्याप याची औपचारिक घोषणा झाली नसली तरी या कंपन्या आपले ग्राहक टिकवण्यासाठी दरांमध्ये बदल घडवून आणतील असे टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टेलिकॉम क्षेत्रावर सध्या सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. तेव्हा हे दर कमी करणे ग्राहकांना जरी परवडणारे असले तरी कंपन्यांना निश्चितच परवडणार नाही.

Leave a Comment