ओएलएक्सवर ‘कडकनाथ’ला जोरदार मागणी

kadaknath
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरूणाने पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यास लक्ष्मी कशी प्रसन्न होते, हे दाखवून दिले असून ओएलएक्सच्या माध्यमातून या तरूणाने चक्क ऑनलाईन अंडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून विशेष म्हणजे ओएलएक्सवरून या तरूणाला चांगलाच प्रतिसाद मिळत असून, सध्या त्याच्याकडे महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधून ग्राहक येत आहेत.

उस्मानाबादी शेळीसाठी उस्मानाबाद हा जिल्हा प्रसिद्ध आहे. त्यातच ई-कॉमर्सचा वापर करत येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अँड्रॉईड अॅप तयार केले. येथील शेतकऱ्यांना या अॅपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विक्रीतून कोंबड्या आणि शेळ्यांना विक्रमी भाव मिळत आहे.

उस्मानाबादच्या सिद्धार्थ नावाच्या तरूणाने ‘दरम्यान, फोटो काढा.. अपलोड करा… विका…’, हा ओएलएक्सचा फंडा आत्मसात केला असून लोकांमध्ये असलेली मागणी त्याने विचारात घेऊन कडकनाथ कोंबडी आणि अंड्याचे फोटो काढले आणि ओएलएक्सवर पोस्ट केले. पारंपरिक व्यवसायाला सिद्धार्थने दिलेली ऑनलाईन तंत्रज्ञानाची प्रचंड प्रभावी ठरली आहे. सध्या सिद्धार्थची अंडी घेण्यासीठी ओएलएक्सच्या माध्यमातून देशभरातील अनेक ठिकाणाहून ग्राहक सिद्धार्थला शोधत उस्मानाबादला येत आहेत.

बाजारात कडकनाथ जातीच्या कोंबडी आणि तिच्या अंड्यांना चांगलीच मागणी असते. नवे काहीतरी करायचा सतत ध्यास असलेल्या सिद्धार्थने मुंबईतल्या सेंट्रल कुक्कुट रिसर्च सेंटरमधून ७०० रुपयांची एक दिवसाची कडकनाथ जातीची १०५ पिल्ले विकत घेतली. पिल्लांची खरेदी केल्यावर त्यांने ही पिल्ले साडेपाच महिने चांगली जोपासली. आता त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत आहे. तब्बल साडेपाच महिन्याच्या सेवेनंतर जन्मलेल्या अंड्याचे फोटो त्याने ओएलएक्सवर पोस्ट केले. कडकनाथ जातीच्या कोंबडीच्या एका अंड्याचा भाव सुमारे ५० रूपयांपर्यंत तर, कोंबडीचा भाव सुमारे १४०० रूपये इतका आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना उस्मानाबादमधील पशुसंवर्धन अधिकारीही चांगली मदत करत असतात. शेतकऱ्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देतात. उस्मानाबादमधील एक पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणेंनी उस्मानाबादी शेळ्यांसाठी एका खास अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून सध्या अनेक शेतकरी फायदा मिळवत आहेत. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे ई-कॉमर्सचा वापर केल्यास बाजारातील दलालांची मक्तेदारी संपृष्टात येईल.

Leave a Comment