आता पोस्टमन काका होणार ‘स्मार्ट’

post
मुंबई : पोस्टमन काकांच्या हाती आता टपाल विभागाने अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिल्यामुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर होणार आहे. हे अ‍ॅप पोस्टमन्सना उपयुक्त ठरणार आहे. टपाल विभागाने ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता कात टाकून ‘स्मार्ट’ होण्याचा मार्ग अवलंबला आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथे नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.

टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment