हुकाचायना – वैराण वाळवंटातील अनुपम सुंदर स्थळ

hauca
पेरूच्या अटाकामा या जगातील सर्वाधिक वैराण वाळवंटात एक छोटेसे पण अतिशय निसर्गरम्य असे स्थळ वसलेले आहे हे कदाचित खरे वाटणार नाही. पण हुकाचायना या नावाचे हे स्थळ वाळवंटातील मृगजळ नाही तर ओअॅसिस आहे. चोहोबाजूने दूरपर्यंत नुसती वाळू आणि वाळूच्या टेकड्या असलेल्या या ठिकाणी सुंदर नैसर्गिक तलाव आहे, झाडे आहेत, हॉटेल आहेत, दुकाने आहेत, लायब्ररी आहे आणि अवघी ९६ कुटुंबांची वस्तीही आहे. स्वप्नवत वाटणार्‍या या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते.

रात्रीच्या गडद अंधारात आणि स्वच्छ चांदण्यात हुकाचायनाची झगमगती शोभा न्याहाळणे ही डोळ्यांसाठी चवदार मेजवानीच असते. या सुंदर ठिकाणाची एक तितकीच सुंदर लोककथाही सांगतात. एक राजकुमारी या ठिकाणी असलेल्या सुंदर नैसर्गित सरोवरात स्नान करत होती तेव्हा एका शिकार्‍याने तिची पारध करण्याचा प्रयत्न केला. राजकुमारी आकाशमार्गे उडाली पण तिच्या उडत्या कपड्यातून येथे वाळवंट तयार झाले. या स्थानाभोवती असलेल्या वाळूच्या प्रचंड टेकड्यांवरून सूर्यास्ताची अपूर्व शोभा पाहता येते.

येथे असलेले नैसर्गिक तळे असेच प्रसिद्ध आहे. या तळ्यातील पाणी औषधी असल्याचे मानले जाते व त्यामुळे पेरूतील श्रीमंत व्यक्तीही येथे खास स्नानासाठी येतात. हे स्थळ स्पॅनिश वसाहत होती त्या ठिकाणापासून ४ किमीवर आहे. मे पासून ऑगस्ट पर्यंतचा कालावधी या ठिकाणी भेट देण्यासाठी योग्य अ्रसतो कारण त्या काळात येथे हिवाळा असतो. पेरूने या ठिकाणाचा समावेश राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे.

Leave a Comment