
दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी गोल्ड मोनेटायझिंग योजना हळूहळू वेग पकडू लागली असून आत्तापर्यंत या योजनेत ९०० किलो सोने जमा झाले असल्याचे अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी टिवट केले आहे. देशाच्या घराघरातून आणि मंदिरांतून पडून असलेले सोने उत्पन्नाचे साधन म्हणून वापरात यावे तसेच देशाचे सोने आयातीवर खर्च होत असलेले मौल्यवान परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली होती.
गोल्ड मोनेटायझिंग योजनेत ९०० किलो सोने जमा
एका अंदाजानुसार भारतात घरांतून तसेच मंदिरातून साधारणपणे २० हजार टन सोने विनावापराचे पडून राहिलेले आहे. ते सरकारच्या या योजनेत गुंतविले जावे व त्याच्या बदली गुंतवणूक करणार्यांना व्याज दिले जावे अशी ही योजना. सुरवातीला त्याला मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड होता. १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत बँकांना असे सोने जमा करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. बँका हे सोने लिलाव करून अथवा सराफांना उधार देऊ शकणार आहेत. मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा व्याजदर अधिक करून ही योजना अधिक आकर्षक बनविली गेली. त्यामुळे योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
सोने जमा करून घेणे तसेच त्याची शुद्धता पडताळून पाहण्यासाठी सध्या ४६ केंद्रे सुरू आहेत. आजही भारत दरवर्षी जवळजवळ १ हजार टन सोने आयात करतो.
