६२ जणांकडे जगातील अर्धी संपत्ती !

world-economic1
लंडन : जगातील अनेक समस्यांपैकी एक सर्वांत मोठी आणि महत्त्वाची समस्या श्रीमंत आणि गरिबांमधील वाढती दरी ही आहे, असे म्हणावे लागेल. त्यातही अधिक चिंतेचे कारण म्हणजे दिवसेंदिवस ही दरी अधिकच वाढत चालली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या रिपोर्टनुसार संपूर्ण जगातील गरिबांकडे जेवढी संपत्ती असेल तेवढी संपत्ती जगातील केवळ ६२ गर्भश्रीमंतांच्या खिशात आहे. यावरूनच ही दरी किती मोठी आहे याचा अंदाज येऊ शकतो.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणा-या वार्षिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. ऑक्सफाम संस्थेच्या अहवालानुसार, २०१० सालापासून जगातील ६२ सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ४४ टक्क्यांनी वाढली आहे. तर ३.५ अब्ज गरीब नागरिकांची संपत्ती ४१ टक्क्यांनी घटली आहे. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी जवळपास ५० टक्के व्यक्ती या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. तसेच यूरोप, चीन, ब्राझील, मेक्सिको, जपान व सौदी अरेबियात उर्वरित श्रीमंत व्यक्ती वास्तव्यास आहेत.

जगातील ७.६ लाख कोटी डॉलर लोकांची संपत्ती ‘टॅक्स हॅवन्स’ मध्ये आहे. प्रत्येकाने योग्य कर भरला. तर सर्व देशातील शासनांकडे दरवर्षी सुमारे १९० अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध होईल. ही रक्कम जगभरातील अनेक गरीब मुलांचे आरोग्य सुधारण्यास उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक गॅब्रियल झुकमन यांनी केले. जगातील सर्वांत गरीब लोक गरीब राष्ट्रांमधून राहत नसून, ते विकसनशील राष्ट्रांमधील आहेत, अशी माहिती आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) अहवालानुसार समोर आली आहे. एकीकडे गरिबांची अवस्था अधिकाधिक बिकट होत असताना श्रीमंतांच्या तिजोरीचे ओझे मात्र वाढतच चालले आहे. या सर्वेक्षणानुसार या जगातील अवघ्या ६२ धनाढ्य लोकांची संपत्ती ही सुमारे अर्धा ते १.७६ खबर डॉलर एवढी वाढली आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये जगातील सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत गरीबांमधील दरी सर्वाधिक वाढली असल्याचे अ‍ॅन इकॉनॉमी फॉर द १ % या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जगामध्ये असणारे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील विषमता संपवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सर्वेक्षण करणा-या ऑक्सफमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क गोल्डरींग म्हणाले. जगात असलेल्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक नऊ लोकांपैकी एक व्यक्ती हा रोज उपाशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा स्थितीत मोजक्या लोकांकडे एवढी गडगंज संपत्ती असणे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहे.