आता शाओमीची पिक-एमआय सेवा!

xiaomi
मुंबई: नुकतेच भारतीय बाजारपेठेत पिक मी सेवा चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने लाँच केली असून ग्राहकांच्या घरातूनच या माध्यमातून त्यांना फोन दुरुस्तीसाठी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सर्वप्रथम ही सेवा दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र आता ही सेवा ६०७६ पेक्षा अधिक पिनकोड, ५६७ शहरे आणि २९ राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. म्हणजेच शाओमीची पिक मी सेवा ही काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना या सेवेअंतर्गत आपल्या एमआय प्रोडक्टना पिक अप आणि ड्रॉप करण्याची सुविधा देण्यात आली आहे. १८९ रुपये या सेवेसाठी मोजावे लागणार आहेत.

फेसबुकवर याबाबत शाओमीने पोस्ट अपडेट केली आहे. त्यानुसार, पिक मी सर्विस संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. ही सेवा आपल्या घरापर्यंत मिळणार आहे. यासाठी १०८०-१०३-६२६८ वर कॉल करुन फक्त आपली एमआय प्रोडक्टविषयी तक्रार नोंदवायची आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या ग्राहकांच्या चांगली सेवा देण्यासाठी प्राथमिक गोष्टींवर भर देण्यास सुरुवात केली आहे.