आता भारतात होणार एके ४७ रायफल्सची निर्मिती !

ak-47
नवी दिल्ली – आता भारतात जगातील सर्वात संहारक शस्त्र म्हणून ओळखले जाणारी एके ४७ रायफलींची निर्मिती होणार असून या शस्त्राचे भारतात उत्पादन सुरू करण्याविषयी रशियन शस्त्रनिर्मिती कंपनीचा संचालक कलाशिकोवने येथील स्थानिक कंपन्याशी बोलणी सुरू केली आहे. येथील स्थानिक भागीदार कंपनीला ही कंपनी तंत्रज्ञान निर्यात करणार आहे. रशियन कंपनीशी अनेक कंपन्यांनी भागीदारी करण्याची तयारी दर्शविली आहे.

२० व्या शतकातील सर्वात संहारक शस्त्र एके ४७ रायफल हे आहे. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांपेक्षा याचा वापर दहशतवाद्यांकडूनच अधिक होत आहे. भारतात याचे उत्पादन सुरू करण्याविषयी २०१५ च्या सुरुवातीपासून चर्चा सुरू आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक भारतीय कंपन्यानी २००८ पासूनच ही रायफल निर्मिती करण्याचा विचार सुरू केला होता.

कलाशिकोव यांनी सांगितले की भारतात आम्ही या शस्त्राचे उत्पादन सुरू करण्याविषयी सरकारी तसेच खासगी कंपन्याच्या संपर्कात आहेत. काही कंपन्याची नावे आम्ही अंतिम केली आहेत. परंतु उत्पादनाबाबत अद्याप बोलणी सुरू आहे. याबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाशी चर्चा केलेली नाही. आमची भारतीय भागीदार कंपनी ही औपचारिकता पार पाडेल. भारतातील खाजगी कंपन्यांना शस्त्र निर्मितीची परवानगी नाही. आम्ही भारतात हे शस्त्र निर्मितीसाठी ६५० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहोत.