आता इंटरनेटशिवाय पाहू शकणार मोबाईलवर टीव्ही

mobile-tv
नवी दिल्ली – रेडिओसारखे इंटरनेटशिवाय आता मोबाईलवर दूरदर्शनचे प्रसारण पाहता येणार असून यात एकूण २० चॅनेल पहाता येणार आहेत. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ खासगी चॅनेल्स पहाता येतील. यासाठी कोणताही शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही. अँड्रॉईड आणि आयफोनवर या प्रसारणाचा लाभ घेता येणार आहे.

२० फ्री टू एअर चॅनेल्स मोबाईलवर दाखवण्यासाठी दूरदर्शनद्वारे डीवीबीटी (डिजिटल वीडिओ ब्रॉडकास्ट टेरेस्ट्रायल) हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सुरुवातीला ते डोंगलच्या सहाय्याने जोडता येईल. याद्वारे दूरदर्शनचे सिग्नल मिळवून आपल्याला इंटरनेट शिवाय टीव्ही पहाता येईल. यानंतर दूरदर्शनचे अॅप तयार करण्यात आले आहे. ते डाऊनलोड केल्यास आपल्याला या २० चॅनेल्सचे थेट प्रसारण मोबाईलवर एफ एम रेडिओसारखे इंटरनेटशिवाय पाहता येणार आहे. सध्या यूरोप मध्ये अशाप्रकारे इंटरनेटशिवाय मोबाईलवर चॅनेल्स पहाता येतात.

सॅमसंग, अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि एचसीएलसारख्या कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये एफ एम रेडिओसारखे दूरदर्शनच्या इनबिल्ट डोंगलची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

या योजनेची ब्लूप्रिंट प्रसार भारतीने तयार केली असून मंजूरीसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवले आहे. तसेच सध्या दिल्लीमध्ये ट्रान्समीटरच्या सहाय्याने या योजनेच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. लवकरच ही योजना प्रत्यक्षात अमलात येईल, असे एका दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.