
मुंबई – सोमवारी भारतीय शेअर बाजारालाही आशियाई बाजारपेठेतील घसरणीचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. आज दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६२४ अंशांनी गडगडला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा ४९० अंशांनी घसरला आहे.
तब्बल १६२४ अंशांनी गडगडला सेन्सेक्स
रुपयाचीसुद्धा डॉलरच्या तुलनेत ६६.४८ पर्यंत घसरण झाली. गेल्या दोन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली पहावयास मिळते आहे. येस बँक, वेदांता, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, आईसीआईसीआई बँक आणि गेलच्या शेअरमध्ये ६.८-४.७५ टक्के घट झालेली पाहावयास मिळाली आहे. जगातील इतर देशांच्या आर्थिक स्थितीपेक्षा भारताची आर्थिक स्थिती खूप चांगली असल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. शेअर बाजाराशी संबंधित अर्थशास्त्रीय घटक नियंत्रणात असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
