पाटणाच पण स्कॉटलंडमधले

patna
बिहार राज्याची राजधानी पाटणा आपल्याला ज्ञात आहे. याच शहराची जवळचा संबंध असलेले एक छोटेसे गांव ब्रिटनच्या स्कॉटलंड या छोट्याश्या राज्यात असल्याचे मात्र कदाचित आपल्याला माहिती नसेल. या गावाचे नांव पाटणा आहे तसेच येथेही गंगा नदी आहे आणि या नदीवरील पुलाला म.गांधी यांचे नांव दिले गेले आहे. दोन्ही गावात फरक इतकाच की बिहारमधील पाटणा गजबजलेले आहे तर हे पाटणा अगदी शांत आणि गर्दी कमी असलेले आहे.

स्कॉटलंडचे मुख्य शहर ग्लासगो पासून जवळ असलेल्या या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५ हजार. या गावाला दोन नद्या आहेत. पैकी छोटी नदी डून म्हणून ओळखली जाते तर मोठी गंगा नावाने ओळखली जाते. या गावाचे नांव पाटणा असण्यामागे इतिहास आहे. या गावातील व्यावसायिक १७४५ साली इस्ट इंडिया कंपनीबरोबर भारतात आला होता. त्याचे नांव विलीयम फुलटर्न. तो भारतातून तांदूळ ब्रिटनला पाठवित असे. त्याचा भाऊ जॉन इस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत मेजर होता आणि त्याची बदली बिहारमधील पाटण्यात झाली होती. येथेच त्याची दोन मुले जन्माला आली. नंतर जॉनचा येथेच मृत्यू झाला. मग हा परिवार स्कॉटलंडला परतला. त्यांनी भारतात चिकार पैसा कमावला होता. त्यातून त्यांनी स्कॉटलंडमध्ये खूप जमीन विकत घेतली आणि कोळसा व चुन्याच्या खाणी सुरू केल्या. मात्र येथे येऊनही ते पाटण्याच्या आठवणी विसरू शकले नाहीत. तेव्हा पाटण्यात जन्मलेल्या विलिम्सने बिहारमधील पाटण्याची आठवण महणून १८०२ साली हे गांव वसविले.

विशेष म्हणजे येथील प्रायमरी शाळांतून भारतीय नृत्य शिकविले जाते. येथे चर्च, गोल्फ क्बल, यूथ ग्रुप, ओल्ड ब्रिज, रेल्वे स्टेशन पाटणा याच नावाने आहेत. मात्र सध्या येथील खाणव्यवसाय मंदीच्या फेर्‍यातून जात आहे परिणामी येथील लोक रोजगारासाठी बाहेर पडू लागले आहेत.

Leave a Comment