तब्बल ४४,०९५ रुपयांचे प्रत्येक भारतीयावर कर्ज

loan
नवी दिल्ली : दिवसेंदिवस प्रत्येक भारतीयांवर कर्जाचा बोजा वाढतच असून, २०१४-१५ मध्ये प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा बोजा २ हजार ९६६ रुपयांनी वाढून तो ४४ हजार ०९५ रुपयांवर पोहोचला आहे. २०१३-१४ मध्ये हा कर्जाचा बोजा ४१ हजार १२९ रुपये होता. सरकारच्या अस्थायी लेखाने दिलेल्या माहितीनुसार कर्जाच्या बोजात देशी-विदेशी कर्जाबरोबरच अन्य बोजाचा समावेश आहे.

जागतिक बँकेच्या देशातील सरकारवर असलेल्या कर्जासंबंधी या वर्षीच्या अहवालानुसार २० प्रमुख विकसनशील देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने देशी कर्जाच्या व्याजापोटी २०१२-१३ मध्ये ४.०४ लाख कोटी, २०१३-१४ मध्ये ४.८५ लाख कोटी आणि २०१४-१५ मध्ये ५.५६ कोटी रुपये अदा केले. याच तीन वर्षांत विदेशी कर्जाच्या व्याजापोटी भारताने ३७.२ कोटी डॉलर, ३६.६ कोटी डॉलर आणि ३८.९ कोटी डॉलर रुपये अदा केले आहेत. ३१ मार्च २०१५ पर्यंत कर्जाच्या व्याजापोटी दिलेली एकूण रक्कम ६८.९५ लाख कोटी रुपये होती.

देशावर देशी आणि विदेशी कर्जाचा बोजा वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. त्यामुळे संपूर्ण देश कर्जाच्या ओझ्याने वाकत चालला आहे. या कर्जापोटीच सरकारला व्याज मोठ्या प्रमाणात भरावे लागत असल्याने आर्थिक विकासाला गती येण्याऐवजी कर्जदारांचीच भरती करण्याची वेळ आलेली आहे. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जवळपास ४४,०९५ रुपये कर्ज आहे. भविष्यात हे आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशावरील वाढते कर्ज हा चिंतेचा विषय बनला आहे.