
ताम्हिणीच्या अभयारण्याची शासनाकडून उपेक्षा
शंभर चौरस किलोमीटरची निगराणी करतात दोन कर्मचारी
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील जैववैविध्याने समृद्ध असलेल्या ताम्हिणी परिसरात दोन वर्षापूर्वी अभयारण्य घोषित होऊनही पुरेसे वन कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाचा वनविभाग उदासीनच आहे. केवळ दोन वनकर्मचारी तब्बल १०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राची निगराणी करीत आहेत.
पुणे शहरापासून केवळ काही किलोमीटरच्या अंतरावर असूनही ताम्हिणीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा शाबूत राहिली. या वनक्षेत्रात अनेक प्रकारच्या दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती, दुर्मीळ औषधी वनस्पती आढळून येतात. या वनक्षेत्रात पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्याजवळ असूनही दळणवळणाची साधने आणि रस्ते उपलब्ध नसल्याने या वनक्षेत्राचे संरक्षण होण्यास मदतच झाली.
मात्र माजी मुख्यमंत्री बॅ अब्दुल रेहमान अंतुले यांच्या संकल्पनेतील पुणे आणि कोकणातील माणगाव यांना जोडणारा रस्ता ताम्हिणीच्या घाटातून सुरू झाला. त्यामुळे घाटावरून कोकणात उतरणारा जवळचा मार्ग म्हणून या परिसरातील मानवी वावर वाढला. रस्ता झाल्याने या क्षेत्रातील जमिनींना किंमत आली. त्यामुळे या परिसरातील वनक्षेत्र मात्र धोक्यात आले. त्यावर या क्षेत्रात अभयारण्य घोषित करण्याची आग्रही मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आणि स्थानिक गावकरी आणि राजकारणी यांचा विरोध डावलून ती मान्यही झाली.
ताम्हिणीमध्ये अभयारण्य घोषित केल्यानंतर या क्षेत्राच्या निगराणीसाठी ३३ वनकर्मचार्यांची मागणी करण्यात आली. मात्र नव्याने भरती न करता अन्य क्षेत्रातील कर्मचा-यांची बदली या अभयारण्यात करण्यात येईल, असे वन मंत्रालय सांगत राहिले. प्रत्यक्षात ना भरतीद्वारे, ना बदलीद्वारे या अभयारण्याला कर्मचारी उपलब्ध झाले.
ताम्हिणीचे निसर्गसौंदर्य आणि अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेने कमी गर्दी यामुळे पुणे आणि परिसरातील अनेक पर्यटक या अभयारण्याच्या क्षेत्राकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे कोकणातील हरिहरेश्वर, दिवेआगर अशा पर्यटनस्थळी जाण्याचा मार्ग ताम्हिणीमधून जात असल्याने विशेषत: पावसाळ्यात वर्षाविहारासाठी या परिसरात पर्यटकांचा वावर वाढत आहे. वन क्षेत्रातील पर्यटनाचे गांभीर्य यापैकी मोजक्याच पर्यटकांमध्ये असते. इतरांकडून अकारण झाडे तोडणे, वन्य प्राण्यांची त्या करणे अथवा त्यांना त्रास देणे, प्रदूषणकारी कचरा करणे असे प्रकार घडतात. मात्र त्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. या पार्श्वभूमीवर ताम्हिणीचे समृद्ध जैववैविध्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
