
जगात सगळीकडेच मोबाईल व्हीडीओ गेम्स बाजाराची वेगाने वाटचाल सुरू असून आत्ताच या व्यवसायाची उलाढाल अब्जावधी डॉलर्सवर पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर कित्येक बड्या कंपन्यांची या व्यवसायावर नजर असून येत्या कांही वर्षात या क्षेत्राचा विस्तार कित्येकपटीने होईल असे संकेत मिळू लागले आहेत.
मोबाईल व्हिडीओ गेम्स बाजाराची अब्जावधींची उलाढाल
फेसबुकने युजर्सना मेसेंजर गेम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डूडल ड्रा फेसबुकवर मेसेंजरवर लाँच झालेला पहिला गेम आहे आणि विशेष म्हणजे दक्षिण आशियात मोबाईल व्हीडिओ गेम्स बाजार विलक्षण वेगाने वाढताना दिसत आहे. या बाजारात दरवर्षी ८६ टक्के वाढ नोंदविली जात आहे असे मोबाईल गेम्स मार्केटिंग न्यूजने नमूद केले आहे. या वर्षअखेर हा गेमिंग बाजार ९१.९५ अब्ज डॉलर्सची उलाढाल नोंदवेल असेही यात म्हटले गेले आहे.
युजर्सची खर्च करण्याची वाढलेली क्षमता मोबाईल व्हीडीओ गेम्सच्या वाढत्या उलाढालीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. सर्वाधिक महसूल कमावणार्या गेममध्ये कँडी क्रश आघाडीवर आहे. गतवर्षी या गेमसाठी युजरनी १.३० अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. व्हीडीओ गेम्स बाजारात अॅपल आणि गुगल हे तगडे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र त्या दोघांच्याही बाजारपेठा वेगळ्या आहेत. अँड्राईड आधरित गुगल ब्राझील, रशिया भारतात उत्तम व्यवसाय करते आहे तर अॅपलच्या आयओएस आधारित गेम्स अमेरिका, जपान, चीन, ब्रिटन येथे चांगला व्यवसाय करत आहेत. २०१४ सालात अॅपलने या गेम्समधून ३१९ कोटी डॉलर्सचा तर गुगलने २६२ कोटी डॉलर्सचा महसूल मिळविला आहे.
सर्वाधिक वेगाने महसूल मिळविणारा कँडीक्रश २०११ साली प्रथम ऑनलाईनवर आला व २०१२ नोव्हेंबरमध्ये तो मोबाईलवर आला. पहिल्याच महिन्यात १० लाख युजरनी तो डाऊनलोड केला होता. हा गेम दररोज ६.३३ लाख डॉलर्सची कमाई करतो आहे आणि दररोज सरासरी तो ६० कोटी वेळा खेळला जातो असेही सर्वेक्षणात दिसून आले आहे.
