भुशी धरण परिसरही हद्दीच्या वादात

bhushi-dam
पुणे: लोणावळा परिसरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला भुशी धरणा परिसरही हद्दीच्या वादात अडकला असून त्यामुळे धरणावर सुरक्षा रक्षक, जीव रक्षक अशा सुविधा उपलब्ध करण्याबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी धरणात बुडून पर्यटकांचे मृत्यू होत आहेत.

भुशी धरणात वर्षाविहारासाठी येणा-या पर्यटकांपैकी सहा ते आठ पर्यटक दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत. धरणात बुडून मागील पाच वर्षात तब्बल तीस जण मरण पावले आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी जीवरक्षक आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र हे धरण रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा आहे. जीवरक्षक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र रेल्वे प्रशासन ही जबाबदारी पार पडत नाही, असा पोलिसांचा आक्षेप आहे.

भुशी धरणातील मृत्यूची कारणे
*उत्साहाच्या भरात पोहोता न येणारेही उतरतात पाण्यात
*पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खोलीचा अंदाज येत नाही
*मद्यपि पर्यटकही बेपर्वाईने उतरतात पाण्यात
*पाण्यात उतरून पोहोण्याच्या आनंदाऐवजी केली जाणारी दंगा-मस्ती

पर्यटकांची बेफिकिरी
गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी दुपारी ३ नंतर या ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे. मात्र पर्यटक ही बंदी पाळण्याऐवजी पोलिसांशी वाद घातला जातो. पोलिसांनी लावलेल्या सूचनाफलकावरील सूचनांचे पर्यटकांकडून सर्रास उल्लंघन केले जाते. आपल्या क्षमतेचा विचार न करता धरणात उतरलेल्या काही पर्यटकांना भर पाण्यात दम लागल्याने ते पोहू शकत नाहीत आणि त्यांचा बुडून मृत्यू होतो.