
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे देशातील सर्वात महागडे शहर असून दिल्ली शहर महागाईत दुस-या स्थानावर असल्याचे समोर आले असून ही माहिती सेवा आणि सल्ला देणारी जागतिक कंपनी मर्सरने केलेल्या सर्वेमधून समोर आली आहे.
दैनंदिन जीवन जगण्यासाठी होणा-या खर्चाच्या हिशेबानुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर आहे. कंपनीच्या सर्वेच्या अहवालात म्हटले आहे की, मुंबई शहरात गतीने होणारा आर्थिक विकास, वस्तू आणि सेवाची चलनवाढ, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिरता यामुळे या शहरात राहणा-यांच्या जीवनमानावरील खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे.
देशातील सर्वांत महागडे शहर आहे मुंबई
त्यामुळे मुंबई हे शहर महागाईमध्ये जगातील देशांच्या यादीत ७४ व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी हे १४० व्या स्थानावर होते. देशाची राजधानी दिल्ली देखील १५७ व्या स्थानावरून उसळी मारून १३२ व्या स्थानावर पोहचले आहे. तर चेन्नई १८५ व्या स्थानाहून २८ स्थान चढून १५७ व्या स्थानावर पोहचले आहे. त्यानंंतर अनुक्रमे बंगळूर, कोलकाता या शहराची नावे आहेत. कंपनीच्या सर्वे अहवालात म्हटले आहे की, अंगोलाची राजधानी लुआंडा हे शहर जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. तर दुस-या स्थानावर हाँगकाँग त्यानंतर जूरिख, सिंगापूर आणि जिनिव्हा ही शहरे पहिल्या पाचमध्ये समाविष्ट आहेत. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर जगातील तिसरे सर्वात स्वस्त शहर नमूद करण्यात आले आहे.
