जाखू पहाडावरचा महाकाय हनुमान

hanuman
उद्या म्हणजे ४ एप्रिल रोजी देशभर हनुमान जयंती साजरी केली जात आहे. मात्र याच दिवशी ग्रहण असल्याने दिवसभर हनुमानाच्या दर्शनाची संधी भाविकांना मिळणार नाही. बहुतेक सर्व मंदिरे ग्रहण सुटल्यानंतरच उघडली जाणार आहेत. हनुमान ही संकटमोचन देवता मानली जाते. देशाच्या प्रत्येक गावात एक तरी हनुमान मंदिर असतेच. हिमाचलची राजधानी सिमला येथील हनुमान मंदिर ऐतिहासिक महत्त्वाचे आहे कारण येथे २४५५ फूट ऊंचीच्या पहाडावर १०८ फूट उंचीची महाकाय हनुमान मूर्ती आहे. हा हनुमान संपूर्ण सिमल्यावर नजर ठेवतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हिमाचल राज्य मुळातच देवभूमी म्हणून ओळखले जाते. जाखू पहाडावर असलेल्या या हनुमान मंदिराची प्रसिद्धी केवळ देशातच नाही तर परदेशातही आहे. येथे पर्यटक आणि श्रद्धाळू मोठ्या विश्वास आणि श्रद्धेने हनुमानाच्या दर्शनासाठी येतात. हा पहाड २५०० फूट उंचाचा असून पहाडावर घनदाट देवदाराचे जंगल आहे. त्यात ही १०८फूट उंचीची मूर्ती उभी असून प्रत्येक ऋतूत तिचे वेगळे सौंदर्य पाहता येते. दसर्‍याला येथे मोठा उत्सव होतो. पौराणिक वाद्ये, घंटा आणि नगारा यांच्या निनादात आरती केली जाते.

असा समज आहे की संजीवनी बुटी आणण्यासाठी जेव्हा हनुमान आकाशमार्गे जात होता तेव्हा त्याने हे जंगल पाहिले व येथे कदाचित संजीवनी वनस्पती असू शकेल म्हणून शोध घेतला. दुसर्या एका कथेनुसार हिमालय मार्गे संजीवनी वनस्पती घेऊन जात असताना त्याच्या पायातील खडावा या पर्वतावर पडली म्हणून तो येथे उतरला. १८३७ पासून या पहाडावरील मंदिराचे संदर्भ सापडत असले तरी १९२० साली हे मंदिर बांधले गेले असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment