वाराणसीत नववर्षाचे खास कार्यक्रम

varanasi
जगातील सर्वात प्राचीन नगरी समजल्या जाणार्‍या काशीत किलक नावाने सुरू होत असलेल्या नववर्षाच्या सोहळ्याची तयारी पारंपारिक पद्धतीने सुरू असून हे वर्ष आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक पद्धतीने साजरे करण्यासाठी काशी सज्ज झाली आहे. कीलक हे २०७२ वे संवत्सर आहे.

उद्या पाडव्याला सुरू होत असलेले हे नवे वर्ष अनुष्ठानाने सुरू केले जाणार आहे त्याचबरोबर परंपरेने गंगेत उभे राहून पहिले अर्घ्य नव्या वर्षाच्या पहिल्या सूर्याला देण्यासाठीही हजारो लोक येणार आहेत.येथील लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १ लाख युवकांच्या हातात देशभावना जागृतीसाठी आणि आपल्या परंपरांच्या ओळखीसाठी राष्ट्र रक्षा सूत्र बांधण्याचा उपक्रम हाती घेतला असून हे कार्यकर्ते १२० महाविद्यालयांना त्यासाठी भेट देणार आहेत. काशीसह १४ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. गेली ८ वर्षे ही संस्था लहान मुलांनी बनविलेली शुभेच्छा पत्रेही पाडव्याच्या निमित्ताने पाठवित आहे.

पाडवा म्हणजे नववर्ष दिवशी पृथ्वी आणि निसर्ग परिवर्तनाच्या फेर्‍यात असतात असा समज आहे.या निमित्ताने होत असलेल्या बदलांच्या अनुरूप संकेत मिळत असतात. हा काळ नवीन उर्जा, शक्ती देणारा काळ आहे आणि त्यामुळेच आपले आराध्य दैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच आपल्यातील कुप्रवृत्तींच्या त्याग करण्यासाठी पूजा अर्चा करण्याची प्रथा आहे. हा दिवस केवळ नववर्षाचा नसतो तर नवजीवनाची ती सुरवात असते अशीही भावना भारतीयांत आहे.