‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी लग्न लावून देणार हिंदू महासभा

hindu-mahasabha
मुंबई : आता काही दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ ला शिल्लक असून त्यापूर्वी हिंदुत्व संघटनांनी आपली भूमिका जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या कपल्सचे लग्न लावून दिले जाईल, असे उत्तर प्रदेशातील हिंदू महासभेने म्हटले आहे.

दरम्यान, दोघांपैकी एक जर दुस-या धर्माचा असेल तर त्याचे शुद्धीकरण करुन लग्न लावले जाईल, असे महासभेने म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या तरी कोणत्याही संघटनेने अशा स्वरुपाची भूमिका घेतली नसली तरी येत्या काही दिवसांत काही घोषणा होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक म्हणाले, की भारतात ३६५ दिवस हे प्रेमाचे दिवस समजले जातात. प्रेमाने समृद्ध असलेल्या देशात आपण राहतो. त्यामुळे कपल्सनी केवळ १४ फेब्रुवारी हा दिवस का साजरा करावा. आम्ही प्रेमाच्या विरोधात नाहीत. जर मुलाचे आणि मुलीचे एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांनी लग्न करावे एवढेच आमचे म्हणणे आहे. जर दोघांनी हा निर्णय घेण्यासाठी वेळ मागीतला तर आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची परवानगी देणार नाही. त्यांच्या आईवडीलांना याची माहिती दिली जाईल.महासभेचे आग्रा येथील प्रमुख महेश चंदना म्हणाले, की भारतातील सर्व रहिवासी हिंदू आहेत. आम्ही दोन धर्मातील कपल्सच्या लग्नाचे स्वागत करतो. परंतु, लग्नापूर्वी दुस-या धर्मातील व्यक्तीचे शुद्धीकरण करावे लागेल. त्यानंतर हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले जाईल.

Leave a Comment