बडया नेत्यांचे आवडते स्मार्टफोन

gadgets
सर्वसामान्य लोकांमध्ये नवनवीन गॅजेटस बद्दल जसे कुतुहल असते, त्यांची स्वतःची जशी खास आवड असते, तशीच जगभरातील देशप्रमुखांनाही गॅजेटसबद्दल आकर्षण असते आणि त्यांचीही स्वतःची खास आवड असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅजेट फ्रेंडली म्हणून प्रसिद्ध आहेत. तीच बाब अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याही बाबतीत आहे. जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रमुख ओबामा हे ब्लॅकबेरी स्मार्टफोन वापरतात. हा असा फोन आहे जो कोणीच हॅक करू शकत नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना मात्र अॅपलची उत्पादने अधिक पसंत पडतात. यामुळेच पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अहमदाबादहून आणलेल्या त्यांच्या वस्तूत त्यांचा अॅपल आयपॅड आणि लॅपटॉपही दिल्लीत पोहोचला. इतकेच नव्हे तर निवडणूक काळात मोदींची जी सेल्फी हिट झाली त्यासाठीही आयफोनचाच वापर केला गेला होता असे समजते.

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी किलंटन यांनाही ब्लॅकबेरीवरच अधिक विश्वास आहे. हिलरी यांच्या असंख्य फोटोत ब्लॅकबेरी त्यांच्यासोबत दिसतो. रशियाचे अध्यक्ष व केजीबीचे माजी प्रमुख ब्लादीमीर पुतीन हे सुरक्षा धोक्यात येऊ शकते म्हणून स्मार्टफोनचा वापर करत नाहीत असे सांगितले जात असले तरी त्यांच्या हातात एमटीएसचा ग्लोनास ९४५ हाअँड्राईड फोन पाहिला गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ब्रिटीश रॉयल फॅमिलीची पहिली पंसती आयफोनला आहे. प्रिन्स विलियम्स आयफोन वापरतो तर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून ब्लॅकबेरीचा वापर करतात.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ब्लॅकबेरीचे फॅन आहेत मात्र त्यांना अॅपल आणि सॅमसंगचे फोन वापरतानाही पाहिले गेले आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल दोन फोन वापरतात. एक नोकिया ६२६० आणि ब्लॅकबेरी झेड १०. नोकियाचा वापर त्या पक्षकामासाठी करतात तर बाकी कामांसाठी ब्लॅकबेरी झेड १० वापरतात. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उंग एसटीसी बटरफ्लायचा वापर करतो असे एका फोटोतून दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या देशात फक्त १० टक्के जनतेलाच मोबाईल वापराची परवानगी आहे. त्यात प्रामुख्याने सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद आयफोन फाईव्हचा वापर करतात आणि प्रामुख्याने ते हा वापर खासगी कामांसाठी करतात. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे स्मार्टफोन नाही तसेच त्यांचे ईमेल अकौंटही नाही. अमेरिकेकडून जगातील अनेक देशप्रमुखांचे फोन व ईमेल ट्रॅक केली जात असल्याची वार्ता जगजाहीर झाली तेव्हाच मनमोहनसिंग यांच्याकडे मोबाईल नाही तसेच त्यांचे ईमेल अकौंट नाही हेही उघड झाले होते.

Leave a Comment