
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजप सरकारकडून शेतक-यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला असून सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपिठग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत अजूनही शेतक-यांपर्यंत पोहचली नसल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीत राहायचे की नाही याचा ही निर्णय पुढच्या महिन्यापासून शेतक-यांच्या भावना जाणून घेऊन घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचीही तीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाभाऊ यांनी केला शेतक-यांच्या फसवणूकीचा आरोप
मंत्रीमंडळ विस्तारात समावेश झाला नसल्याने महायुतीतील मित्रपक्षा प्रचंड नाराज आहेत. त्यातच हे सरकार शेतक-यांनाही फसवीत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठग्रस्तांना मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात ती अजूनही मिळाली नसल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. शेतक-यांची अशी फसवणूक होणार असेल तर आंदोलनाच्या तयारीत स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय ऊसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे ही मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही प्रश्नांवर शेतक-यांची मते जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
