
अॅडलेड – भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पहिल्या कसोटीसामन्याला मंगळवारपासून सुरुवात होणार असून पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महेंद्रसिंह धोनी अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने ही माहिती दिली.
अखेर विराट करणार टीम इंडियाचे नेतृत्व
कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आल्याने धोनीचा संघात समावेश होण्याची शक्यता होती. मात्र तो अद्यापही अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
याआधी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले होते. एकदिवसीय सामन्यानंतर पहिल्यांदाच तो कसोटी सामन्यासाठी संघाचे नेतृत्व करणार आहे.
त्याचबरोबर मायकेल क्लार्क भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेला क्लार्क तंदुरुस्त असल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला.
दरम्यान, फिल ह्युजला आदरांजली वाहण्यासाठी पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघातील तेरावा खेळाडू म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे.
