
पुणे – काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडी परिसरातून बेपत्ता झालेल्या तिन्ही महिला सुरत येथे सापडल्या असून त्या तिघींनी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील बेपत्ता महिलांनी केला होता अपहरणाचा बनाव
शुक्रवार २८ नोव्हेंबरपासून हिंजवडी येथील फेज दोनजवळील ओझरकरवाडी येथून बेपत्ता असलेल्या प्रतिभा प्रकाश हजारे (२५), मंगला सिद्धार्थ इंगळे (२६) आणि विद्या दशरथ खाडे (२४) या तीन महिला एक आठवड्याने गुजरातमधील सुरत येथे सापडल्या. या तिन्ही महिलांनी नव-यांना कंटाळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता.
प्रतिभा ही डीएलएफ या कंपनीत सुरक्षारक्षक आहे, तर विद्या ही इन्फोसिसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करते. तर मंगला इंगळे ही गृहिणी आहे. त्या तिघीही शेजारी शेजारी राहतात. शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या महिला आठवडाभर घरी परतल्याच नव्हत्या.
