
दिल्ली – अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच बाजारात आणण्यात आलेल्या सियाझ कार मारूती मोटर्सने रिकॉल केल्या असून या गाड्यांच्या क्लच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दोष आढळल्याने या गाड्या परत बोलावल्या गेल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत बनलेल्या या प्रिमियम सेदान कार यात समाविष्ट असून या प्रकारे कोणता ना कोणता दोष आढळल्याने विविध कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात साडेपाच लाखांहून अधिक गाड्या रिकॉल केल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
मारूतीने रिकॉल केल्या सियाझ कार
भारतात सर्वात जास्त गाड्या रिकॉल करणार्या कंपन्यात अमेरिकेची फोर्ड प्रथम क्रमांकावर असून त्यांनी गेल्या दोन वर्षात २ लाख ९९ हजार गाड्या रिकॉल केल्या आहेत. त्या पाठोपाठ भारतातील नंबर एकची कंपनी असलेल्या मारूतीचा नंबर असून त्यांनी दोन वर्षात १ लाख ४ हजाार गाड्या रिकॉल केल्या आहेत. होंडाने ७६२३६, महिंद्र ने २८०२१, निस्सान ने २८१८७ तर टोयाटोने १५७१६ गाड्या रिकॉल केल्या आहेत. अन्य कंपन्यांनीही आपली वाहने रिकॉल केली आहेत.
मारूती कंपनीकडून असे जाहीर करण्यात आले आहे की ज्या ग्राहकांनी या काळात सियाझ खरेदी केली असेल त्यांची गाडी रिकॉलमध्ये आहे का याची माहिती त्यांना कंपनीच्या वेबसाईटवर गाडीचा चासी नंबर दिल्यानंतर मिळू शकेल अथवा डिलरकडे चौकशी केल्यासही ही माहिती मिळू शकेल. ज्यांची गाडी रिकॉल यादीत आहे त्यांच्या गाड्यांची तपासणी आणि पार्ट रिप्लेसमेंट मोफत करून दिली जाणार आहे.
