भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ९

irvikullam
इर्वीकोलम अभयारण्य
निसर्गसुंदर केरळ राज्यातील मुकुटमणी असलेल्या हिरव्याकंच मुन्नार पासून अवघ्या सहा मैलावर असलेले एर्वीकोलम राष्ट्रीय उद्यान नामशेष होऊ घातलेल्या निलगिरी टारसाठी प्रसिद्ध आहे. १९७८ साली हे अभयारण्य म्हणून घोषित केले गेले येथे सर्वाधिक म्हणजे ७०० निलगिरी टार आहेत. याशिवाय वाघ, बिबटे, ढोल्स, रानकुत्री, रानमांजरे, यांच्यासारख्या २६ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यात सांबर, इंडियन मुटजॅक, गवे यांचाही समावेश आहे. असंख्य पक्षांचेही हे अभयारण्य माहेरघर आहे. पिपिट, वुड पिजन, फ्लॅशकॅचर, केरळ लाफिग थ्रश, काळे व नारिंगी फ्लॅशकॅचर, अशा १३२ पक्षी प्रजाती येथे पाहायला मिळतात.

या अभयारण्यात वन्यप्रेमींना अनेक जातींच्या फुलपाखरांचाही मागोवा घेता येतो. त्यात रेड डिस्क बुशब्राऊन, पालनी फोरविग अशा १०१ जातींची फुलपाखरे आहेत. या जंगलात दोन वर्षांपूर्वी नवीन जातीचा बेडूकही आढळला असून त्याचे नामकरण रिसप्लेंडंट श्रब फ्रॉग असे केले गेले आहे. या शिवाय येथे बेडकांच्या विविध १९ जाती सापडतात. या उद्यानातच चहाचे मळेही आहेत आणि धुक्यात लपेटलेल्या पर्वतरांगाही येथून फारच सुंदर दिसतात. या पर्वतउतारांवर दर बारा वर्षांनी नीलकुरुंजीची फुले फुलतात आणि हे उतार अक्षरशः निळ्या रंगात रंगून निघतात.

या अभराण्यात जाण्यासाठी सर्वात जवळचा विमानतळ कोची अथवा तमीळनाडूतील को ईमतूर हा आहे. रेल्वेने जायचे असल्यास अलूवा अथवा कोईमतूर स्टेशन जवळ आहे. मुन्नारपासून हे अभयारण्य अगदी जवळ असून केवळ ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर तेथे पोहोचता येते. या अभयारण्यात राहण्याची सुविधा नाही. अभयारण्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त अशी आहे. हवेच्या दृष्टीने सप्टेंबर ते नोव्हेंबर हा हंगाम सुसह्य होत असला तरी प्राणीदर्शन करायचे असेल तर मात्र एप्रिल ते जून हा हंगाम सर्वोत्तम आहे.

Leave a Comment