मुकेश अंबानीच्या विमानाला आग लागल्याच्या संदेशाने गोंधळ

viman
मुंबई – रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी याच्या खासगी विमानाला आग लागली असून ते समुद्रात कोसळत असल्याचा संदेश मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे आल्याने कांही काळ एकच गोंधळ निर्माण झाला मात्र नंतर रेडिओ सिग्नलची चाचणी घेत असताना हा संदेश दिला गेल्याचा खुलासा झाल्यानंतर वातावरण निवळले.

सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत मुकेश यांनी पत्नी नीता यांना २००७ साली वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिलेल्या एअरबस ३१९ या विमानातून मेडे असा संदेश आला. याचा अर्थ विमानाला अपघात होतोय, वाचवा असा होतो. संदेश दोन वेळा दिला गेला. पहिल्यांदा विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचा व विमान दिल्ली मस्कत मार्गावर असल्याचा संदेश आला तर दुसर्‍या संदेशात विमान समुद्रात कोसळत असल्याचे सांगितले गेले. विमान वाहतूक कंट्रोल विभागाने तातडीने दिल्ली मस्कत कंट्रोल रूमशी संपर्क साधून त्यांच्याकडे कांही संदेश आला काय याची विचारणा केली मात्र तेथून नकार मिळताच रेडिओ फ्रिक्वेन्सीचा उपयोग करून विमानाचा ठावठिकाणा शोधला गेला. तेव्हा विमान मुंबईच्या विमानतळावरील हँगरमध्येच असल्याचे निष्पन्न झाले. त्वरीत त्या जागीही अधिकारी पोहोचले तेव्हा विमानात कोणीच नसल्याचे आढळले.

पायलट रेडिओ सिग्नल टेस्टींग करत असावा व कदाचित नियंत्रण कक्षाला सांगण्यास विसरला असावा असा अंदाज केला गेला आहे. रिलायन्स समुहाकडून टेस्टींग केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे मात्र पायलटने पूर्वसूचना दिली होती असेही प्रतिपादन करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आठवड्याभरात त्या संबंधीचा रिपोर्ट येईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment