
मुंबई – येत्या बुधवारी भाजपच्या नेतृत्वातील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असून विधानसभेतील नेता निवडण्यासाठी आमदारांची आज बैठक होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून त्याच दिवशी किंवा २८ तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल. त्यानंतर लगेच २९ तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर राज्याभिषेक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वानखेडे स्टेडियम बूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सोहळ्यासाठी इच्छुकांसह नेते व समर्थक सज्ज झाले आहे. ’चलो मुंबई’ म्हणत कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ’मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेला पायंड्याची महाराष्ट्रातही अंमलबजावणी होणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ नॅनो असेल, असे संकेत पक्षाने दिले आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे.
