मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडल्यानंतरच शिवसेनेकडे पाठिंबा मागणार

combo
मुंबई – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपला पुन्हा युती करावी लागणार असली तरी आता भाजप शिवसेनेला फारसे महत्त्व देणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आधी पक्षाला हवा तोच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडल्यानंतर मगच शिवसेनेशी युतीची बोलणी करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याला दोन्ही पक्षांमधील मुख्यमंत्रिपदासाठीचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होता. शिवसेनेच्या भावना याबाबत अत्यंत तीव्र होत्या. अखेरपर्यंत मुख्यमंत्री आमचाचा होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. शिवाय, भाजपच्या जागा शिवसेनेपेक्षा दुप्पट असल्याने त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नसल्याने किमान आपल्याला मान्य असलेला उमेदवार असावा, असा प्रयत्न आता शिवसेनेकडून होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेशी पूर्णपणे जुळवून घेणारा नेता भाजपला निवडावा लागेल. मात्र, शिवसेनेला अशी कोणतीही संधी देण्याच्या मन:स्थितीत भाजप नाही. त्यामुळेच युतीची रीतसर बोलणी करण्याआधी पक्षाचा नेता निवडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.