केंद्रापाठोपाठ राज्यातही काँग्रेला विरोधी पक्षनेतेपदाची हुलकावणी ?

congress
मुंबई – महाराष्ट्रात भाजपा मिळालेल्या यशानंतर त्यामुळे कोणत्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून केंद्रापाठोपाठ राज्यातही काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपद हुलकावणी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२३ जागा आहेत त्यापाठोपाठ ६३ जागा मिळवून शिवसेना दुस-या क्रमांकावर राहीली. तर काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी ४१ जागा मिळवून अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या जागेवर आहेत. त्यातच राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा की नाही याबाबत भाजपा नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे जाणवते. अशा वेळी आपला जुना मित्र शिवसेनेला सोबत घेण्याविषयी भाजपत चर्चा सुरू झाल्यामुळे भाजपा -शिवसेना युती झाल्यास ४२ जागा मिळविणारा काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकपूर्व आघाडी केलेल्या हितेंद ठाकूर यांच्या बविआने तीन जागा पटकावल्यामुळे राष्ट्रवादी सुद्धा विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार यात शंका नाही. तसे झाल्यास केंद्रापाठोपाठ राज्यातही विरोधी पक्षनेतेपद गमविण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढविण्याची शक्यता आहे.