
मुंबई – भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता एखाद्या प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. जे जे पाठिंबा देतील, त्यांचे स्वागतच आहे, असे विधान खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्याचवेळी शिवसेनेने दुसरीकडे मुख्यमंत्री आमचाच होईल, असे सांगत भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
पुन्हा संसार थाटण्याचे संकेत
गेल्या २५ वर्षांपासून भाजप आणि शिवसेना युती करून निवडणुकीला सामोरे जात होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले. प्रचाराच्या काळात शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांवर कडवी टीका करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या काळातील कटुता विसरून हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते, तरीही मतदारांनी युतीच्या बाजूने कौल दिला असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीचे सर्व निकाल स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
