
मुंबई – प्रसारमाध्यमांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमधून भाजपाची सत्ता येण्याचे संकेत मिळाल्यानंतर शिवसेनेने देखील मवाळ धोरण घेण्याची वृत्ते झळकली आहेत. कालपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगणार्या नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सर्वत्र जोरदार चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार किंवा या सर्वांपेक्षा आणखी कोणी उमेदवार याबाबत आता तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. या सर्वांमध्ये आता पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्री झालो तर ही सदभाग्याची गोष्ट असेल असे म्हणून आपण स्पर्धेत असल्याचे संकेत दिले आहेत. कालपर्यंत केंद्रात खूष आहे असे म्हणणार्या नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ती पूर्ण होत नसेल तर आपले पसंतीचे नाव म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पुढे केले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पसंतीचे नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे याआधीच नाव चर्चेत आहे. तर ज्येष्ठतेच्या निकषानुसार एकनाथ खडसे हे माजी विरोधी पक्ष नेते असल्याने त्यांचाच मुख्यमंत्री पदासाठी दावा योग्य ठरतो असे सांगितले जात आहे. निकाल हाती यायला केवळ २४ तास शिल्लक असताना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गरमा-गरमी सुरु झाली आहे.
भाजपमध्ये आता ‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’साठी प्रयत्न सुरु
भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यास कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेता येईल याबाबतची चाचपणी सुरु झाली असून किती जागा मिळणार यावर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार याचे गणित अवलंबून असल्याचे मानले जात आहे. सत्ता पूर्ण बहुमताची नसेल तर ती टिकवण्यासाठी कोणत्या भाजप नेत्याला घटक पक्षांचा सर्वाधिक पाठिंबा मिळतो यावर देखील कोण मुख्यमंत्री होणार या प्रश्नाचे उत्तर शोधले जाईल. भाजपला सत्तेसाठी घटक पक्ष सक्रियपणे पाठिंबा देतात की बाहेरून पाठिंबा देतात यावर देखील मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजपचे ओबीसी आणि मराठा आमदार निवडून येण्याचे प्रमाण पाहून देखील मुख्यमंत्री कोणत्या समाजाचा असावा याचे उत्तर शोधावे लागणार आहे. भाजपमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपतींचा आशिर्वाद हे शब्द जाणीवपूर्वक वापरले गेल्याने मराठी मुख्यमंत्री करायचा झाल्यास विनोद तावडे, इतर मागासवर्गीय मुख्यमंत्री करायचा झाल्यास एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय नेतृत्वाच्या पसंतीचा उमेदवार द्यायचा झाल्यास नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
