फेसबूकवर एकटेपणाचे आयुष्य जगणा-यांची संख्या जास्त

facebook
न्यूयॉर्क – एकटेपणाचे आयुष्य जगणा-यांची फेसबूकवरील संख्या वाढत चालली आहे. एका ताज्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. एकटेपणावर मार्ग काढण्यासाठी अनेकदा फेसबूकच्या माध्यमातून नवे मित्र मैत्रिणी शोधले जात आहेत आणि याचा फायदा फेसबूकच्या लोकप्रियतेला होत आहे. अभ्यासकर्त्यांनी जाहिर केलेल्या निष्कर्षानुसार फेसबूक वापरकर्त्यांमध्ये भावनिक एकटेपणाच्या कल्पना मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्या असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हेतर हे लोक एकटेपणा घालवण्यासाठी वाटेल त्या पातळीवर जाऊन समूह संपर्क माध्यमावर तुटून पडले आहेत. अमेरिकेच्या विस्कोसीन विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक हेओन सॉंग यांनी सांगितले की, मोकळेपणाने सार्वजनिक जीवन जगणा-या लोकांच्या तुलनेत एकटेपणात आयुष्य जगणा-यांची संख्या फेसबूकवर सर्वाधिक आहे. हे लोक काहीसे लाजरेबुजरे, हट्टी आणि जिद्दी स्वभावाचे असतात. समाजातील लोकांमध्ये उठणे बसणे आणि संपर्क ठेवणे यात त्यांना अडचणी असतात. फेसबूकच्या माध्यमातून मानसिकदृष्ट्या समाजाशी जोडले जाण्याचा आणि एकटेपणा घालवण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. अभ्यासकर्त्यांनी फेसबूकचा वापर करणा-या व्यक्तींच्या एकटेपणामधील अंतर्गत अडचणी समजण्याचा प्रयत्न केला असता असे आढळू न आले की एकटेपणाची भावनिक जाणीव जेवढी अधिक तीव्र असेल तेवढा जास्तीतजास्त वेळ हे लोक फेसबूकवर घालवतात. इंटरनेटच्या वापरामुळे लोकांमुळे एकटेपणाने भावनिक आयुष्य घालवण्याकडील कल वाढत चालला आहे, असाही निष्कर्ष प्रा. सॉंग यांनी नोंदवला आहे. एकटेपणाने ग्रस्त असलेले हे लोक फेसबूकवर आपला अधिकाधिक वेळ घालवतात आणि इंटरनेटचा वापर करणा-यांमध्ये एकटेपणाची भावना वेगाने वाढीस लागली आहे.

Leave a Comment