प्रस्थापितांकडून मटण पाटर्यांवर २५ ते ३० कोटींची उधळपट्टी ?

party
अहमदनगर – यंदा सर्वच पक्ष वेगवेगळ्या निवडणूक लढवत असल्याने जिंकून येण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सर्वच उमेदवार, कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत. अशा स्थितीत कार्यकर्ते, मतदारांना खूश करण्यासाठी मटण, दारू यांच्यावर लाखो, करोडो रुपये खर्च होत आहेत. विशेषतः मटण पाटर्यांवर सर्वाधिक भर आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, शिर्डी, श्रीगोंदा, पारनेर, नगर शहर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड, अकोले या सर्वच मतदारसंघात कार्यकर्त्यांना व मतदारांना जेवणावळी सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत किमान ५० हजारांहून अधिक बोकडांची कत्तल झाल्याचा अंदाज आहे. मटण पाटर्यांवर २५ ते ३० कोटींची उधळपट्टी झाल्याचा आणि मद्यावरही साधारण तितकीच उधळपट्टी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून मतदार तसेच कार्यकर्त्यांची मोठी चंगळ झाली आहे.

साखर सम्राटांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत पैशाची वारेमाप उधळपट्टी होते. तसेच प्रचारासाठी भरमसाठ वाहने, सभा व प्रचार फेरीसाठी भाड्याने आणलेली माणसे, स्थानिक दैनिकांना दररोजच्या प्रचाराच्या बातम्या देण्यासाठी पेड न्यूजवर केलेला प्रचंड खर्च यामुळे प्रत्येक मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुरू आहे. आपल्या मतदारसंघातला प्रचार अधिक प्रभावी होण्यासाठी प्रस्तापितांनी भाडोत्री माणसांचा अधिक वापर केला आहे. दरम्यान भरगच्च सभा आणि प्रचार फेरी व्हावी यासाठी भाडोत्री माणसांचा वापर अधिक केला गेला. ३०० ते ४०० रुपये रोजंदारीवर पिण्यासाठी पाऊच व नाश्ता पाकिटांची सोय केली. त्यानंतर देखील एका मताला पाचशे रुपयांपासून अडीच हजार रुपये वाटण्यात येणार असल्याचे समजते. निवडणूक प्रचार खर्चावर आयोगाची बंधने असली तरी प्रत्येक मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सर्रास सुरू आहे.