मोदींच्या ‘गुलामगिरी’ला अजित पवारांचे चोख प्रत्युत्तर

ajit-pawar
सातारा : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत जनतेला गुलामगिरीत ठेवल्याचा आरोप करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोख प्रत्युत्तर दिले असून बारामतीतील गुलामगिरी शोधून दाखवा, असे खुले आव्हानच पवारांनी मोदींना दिले आहे.

माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी येथील कुडाळमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. बारामती तालुक्यातील ४० गावांचा पाण्याचा प्रश्न साठ वर्षांपासून कायम असल्याची टीका मोदी यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, पाण्याचा प्रश्न असता तर आतापर्यंत बारामतीच्या जनतेने आम्हाला निवडून दिले नसते. बारामतीत कुणीही उठतो आणि पवार कुटूंबियांवर टीका करीत असतो, असे सांगत बारामतीतील गुलामगिरी शोधून दाखवावी, असे आव्हान त्यांनी मोदींना दिले.

गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचा पुनरूच्चार करून पवार यांनी भाजपाच्या ‘महाराष्ट्र माझा..’ या जाहिरातीची खिल्ली उडविली. भारत-पाक सीमेवर गोळीबार सुरू आहे. चीनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याएवजी पंतप्रधान चीनी राष्ट्राध्यक्षांचा गुजरातमध्ये पाहुणचार करण्यात व्यस्त असतात, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर चौफेर टीकास्त्र सोडले.