माजी पंतप्रधानांच्य़ा मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

qadir
लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांचा मुलगा अब्दुल कादिरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर जावेद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा २३ वर्षीय मुलगा ताहिर हा बुधवारी संध्याकाळी सुरक्षा परिसरातून जात होता. त्यावेळेस त्याची आणि अब्दुल कादिरच्या सुरक्षा रक्षकांची शाब्दिक चकमक झाली. सुरक्षा रक्षकांनी ताहिर याला सदर मार्ग अतिमहत्वाच्या व्यक्तिंकरता मोकळा करण्यासाठी त्यांच्या मार्गातून हटण्यास सांगितले. ताहिर याला यासाठी थोडा वेळ लागल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात ताहिरचा दुर्दैवी अंत झाला. ताहिर याच्या कुटुंबियांनी त्यानंतर त्याचा मृतदेह युसुफ रझा गिलानी यांच्या निवासस्थाना बाहेर ठेवला. तसेच कादिर आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे कार्यकर्तेदेखील या निदर्शनांमध्ये सहभागी झाले. अनेक तास चाललेल्या निदर्शनांनंतर पोलिसांनी कादिर आणि त्याच्या पाच सुरक्षारक्षकांविरोधात हत्येचा आणि दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल केला.