
कोल्हापूर – भारतीय जनता पार्टी टोलच्या पैशावर चालत नाही. त्यामुळे केवळ भाजपाच जुलमी टोलपासून मुक्ती देऊ शकते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी कोल्हापूर येथे सांगितले. भाजपा उमेदवार अमोल महाडिक व महेश जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
जुलमी टोलपासून मुक्ती केवळ भाजपाच देऊ शकते : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अजित पवार यांनी कोल्हापूरला आल्यावर सांगितले होते की, शंभर दिवसांत शहराचा टोल रद्द करू. पण त्यांच्या पक्षाकडे खात्याने लावलेल्या टोलच्या प्रश्नावर ते गेली चार वर्षे झोपले होते का, हा प्रश्न आहे. कोल्हापूरला या जुलमी टोलपासून भाजपाच मुक्ती देऊ शकते. आम्ही टोलच्या पैशावर पक्ष चालवत नाही. राज्यात जेथे जेथे काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसने जुलमी टोलचा जिझिया कर लावला आहे, तो परत घेण्याचा निर्णय भाजपा सत्तेवर आल्यावर घेईल. त्यांनी सांगितले की, लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण आहेत. लोडशेडिंगचे संकट सुलतानी आहे. राज्याची वीजनिर्मितीची क्षमता दहा हजार मेगावॅटची आहे. वीजमंडळातील भ्रष्टाचार कमी केला व वीजनिर्मिती क्षमता वीस टक्क्यांनी वाढवली तरी दोन हजार मेगावॅटची जादा निर्मिती होईल. एवढ्या उपायाने लोडशेडिंग बंद करता येईल. भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर एका वर्षात राज्य लोडशेडिंगमुक्त करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, राज्यात उद्योग बंद पडत आहेत. नवे उद्योग येत नाहीत. व्यापार उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करण्याच्याऐवजी काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने एलबीटी हा लूटो बांटो टॅक्स लागू केला. भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्य एलबीटीमुक्त करण्याचा पहिला निर्णय घेण्यात येईल. त्यांनी पुढे सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर सांगितले होते की, देशात भाजपाचे सरकार येईल व ते शिवाजी महाराजांनी जसे राज्य चालवले तसे चालवले जाईल. पंतप्रधान मोदी आपल्या सरकारचा कारभार शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गानेच चालवत आहेत, असे देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मात्र काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत कायदा–सुव्यवस्था उरली नाही. राज्यात कायद्याचे नाही तर गुंडांचे राज्य आहे. दोषसिद्धीचे प्रमाण इतके कमी आहे की, पकडलेल्या शंभर गुन्हेगारांपैकी केवळ नऊजणांनाच शिक्षा होते व उरलेले निर्दोष सुटतात. आता जनतेने निर्धार केला आहे की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट करायचे, असे यावेळी फडणवीस म्हणाले.
