आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा विकास ठप्प ! – देवेंद्र फडणवीस

fadnvis
मुंबई – काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा आर्थिक विकास ठप्प झाला असून गेल्या १५ वर्षांत मुंबईची अवस्था वाईट झाली आहे. राज्यात काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केल्याशिवाय सफाई होणार नाही. त्यामुळे मुंबई व परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही. भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार आल्यानंतर मुंबई व सभोवतालच्या क्षेत्रात बांद्रा–कुर्ला कॉम्प्लेक्ससारखी दहा संकुले उभारू व त्याद्वारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

फडणवीस म्हणाले की, मुंबईची आर्थिक वाढ थांबली आहे. येथे मोठी लोकसंख्या असल्याने आर्थिक उलाढाल चालू आहे. पण अशा रितीने फार काळ चालू शकत नाही. मुंबई हे सेवाक्षेत्राचे केंद्र होऊ शकते, पण त्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केल्या नाहीत. सेवा क्षेत्रात मुंबईच्या युवकांना मोठ्या संख्येने रोजगार मिळेल. मुंबई शहर व परिसरात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससारखी दहा संकुले तयार केली तर तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. हे काम राज्यात सत्तेवर आल्यावर भारतीय जनता पार्टीच करू शकेल. कारण आम्ही मुंबईला केवळ पैसा कमावण्याचे मशीन समजत नाही. एलबीटी हा जाचक कर आहे. त्यामुळे `इन्स्पेक्टर राज’चा व्यापाऱ्यांना त्रास होतो. हा कर रद्द करा, असे आम्ही आवाहन केले व राज्य सरकारला पर्यायही सुचवला. पण सरकारने तसे केले नाही. भाजपा हा एलबीटीसारख्या प्रतिगामी कराच्या विरोधात असून सत्तेवर आल्यावर हा कर रद्द करू, असे फडणवीस म्हणाले.