
धुळे – ‘भाजप महाराष्ट्राचे तुकडे पाडणार असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची एकता कोणीही तोडू शकत नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकत नाही. मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे. देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राशिवाय देश प्रगती करू शकत नाही. आम्ही कॉंग्रेससारखी खोटी आश्वासने देत नाही. पण मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. अशा वक्तव्यातून पंतप्रधान मोदींनी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. सिंदखेडामधील जयकुमार रावल यांच्या प्रचारसभेत पंतप्रधान बोलत होते. ‘निवडणूकीच्या ज्वरामुळे पराभव दिसू लागलेली मंडळी आज वाटेल ती विधाने करत आहेत, अशी टिका करत जेवढी चिखलफेक कराल, तेवढाच कमळही बहरेल, असे प्रतिपादन मोदींनी केले.
दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही ! – नरेंद्र मोदी
मोदी म्हणाले की, मी गरिबी बघितली असल्याने मला गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो काढावे लागत नाही, असे म्हणत मोदींनी कॉंग्रेसच्या युवराजांवर नाव न घेता तोफ डागली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केला. आघाडी सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी ३,७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील १५ वर्षे वाया गेली नसती तर दोन पिढ्या वाचल्या असत्या. त्यामुळे १५ वर्षांपासून भ्रष्टाचार आणि अन्य वाईट वृत्तींपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त करा, असे आवाहन मोदींनी केले. ज्या शेतक-यांनी आम्हाला कांदा दिला. त्यांच्यावर अन्याय होऊ नेणार नाही. मी जनतेचा सेवकच आहे आणि लोकसभा निवडणूकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. पाच वर्षांनंतर तुम्हाला संपूर्ण कामकाजाचा हिशोब देऊ, असेही मोदी म्हणाले.
