
लोणावळा – शिवछत्रपतींच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर सहा वर्षात त्यासाठी एक दगडही न बसविणाऱ्या शरद पवार यांना शिवछत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी घणाघाती टिका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी लोणावळा येथे केली. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अमित शाह बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी आमदार दिगंबर भेगडे व रूपलेखा ढोरे उपस्थित होते.
शिवछत्रपतींचे नाव घेण्याचा पवारांना अधिकार नाही : अमित शहा
अमित शाह म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आम्हाला शिवछत्रपतींचा सन्मान करा म्हणतात. पण २००८ पासून शिवस्मारकाची घोषणा केली तरी त्यांना अजून त्यासाठी एक दगडही बसविलेला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात शिवस्मारकासाठी भरीव तरतूदही केली नाही. आता निवडणूक आल्यावर त्यांना शिवाजी महाराजांची आठवण झाली आहे. शरद पवारांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. लोणावळ्याचा परिसर ही शिवछत्रपतींची भूमी आहे. येथे पाऊल ठेवल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहिले. या भूमीला आपण प्रणाम करतो, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेली पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना सत्तेचा अहंकार एवढा झाला की, त्यांच्या इशाऱ्यावर लोणावळ्याजवळ आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्याचा तपास योग्य रितीने झाला नाही. भाजपा युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर या गोळीबाराची पुन्हा चौकशी करू व दोषींना शिक्षा करू. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला केंद्र सरकारच्या कामाबद्दल हिशेब मागतात पण विधानसभा निवडणुकीत हिशेब देण्याची तुमची वेळ आहे, असे बजावून मा. अमित शाह म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांत अकरा लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार आघाडी सरकारच्या नेत्यांनी केला. पाच वर्षे राज्य सरकार चालेल एवढे पैसे त्यांनी खाल्ले. एकेकाळी विविध क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र आता गुंतवणूक, सिंचन, रोजगार अशा विविध क्षेत्रात मागे पडला आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल व राज्याला देशात अग्रेसर बनवायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना साथ देऊन त्यांच्यासोबत काम करणारे राज्य सरकार हवे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर रोजी कमळाच्या चिन्हाचे बटण दाबा, असे आवाहन त्यांनी केले.
