
मुंबई – मराठीपणाच्या मुद्द्यावर निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या ठाकरे बंधूंमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भारतीय जनता पक्षावर टिका करण्याचे समान सूत्र दिसून आले आहे. केंद्रात प्रादेशिक पक्ष आणि आघाडीचे राजकारण संपविणार्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता संपादन करण्याचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ठाकरे बंधूंनी आता कॉंग्रेसला सोडून भाजपलाच क्रमांक एकचाच राजकीय शत्रू ठरविले आहे. गेल्या २५ वर्षांची सेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय अस्तित्वासाठी जुंपली आहे. विधानसभा निवडणूकीच्या मैदानात मराठी मतांची विभागणी करणार्या या दोन भावांच्या भांडणामुळे विधानसभेत त्यांचे संख्याबळ मर्यादित होण्याचा धोका आहे.
ठाकरे बंधूंचे एकच लक्ष्य, मोदी आणि भारतीय जनता पक्ष
भाजपसोबत असल्याने अमराठी मते गुपचूप पटकाविणार्या शिवसेनेला आता मनसेने पळविलेल्या मराठीपणाच्या मुद्द्याला देखील गोंजारावे लागत आहे आणि गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांची पूर्वी आयतीच मिळणारी मते कशी मिळवावीत असा पेच पडला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र जयललिता, ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्या सारखे स्वबळावर मुख्यमंत्री व्हावे अशी स्वप्न पडत आहेत. त्यासाठी आवश्यक राजकीय शक्ती त्यांच्याकडे नसल्याने ते भाजपवर तोंडसुख घेत आहेत. लोकसभा निवडणूकीत भाजपसोबत युती नसताना देखील मोदींचे छायाचित्र लावून प्रचार करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी प्रचाराचा भडिमार मोदी या विषयावरच केंद्रित केला आहे. लोकसभेत ज्यांच्या नावावर मते मागितली तेच मोदी आता ठाकरे बंधूंना शत्रू वाटू लागले आहेत.
केवळ चार महिन्यांत बदललेल्या या राजकीय वातावरणामुळे सेना-मनसे अशी विभागणी झालेल्या मराठी मतदारांच्या मनात असलेल्या संभ्रमात भर पडणार आहे. निवडणूकानंतर दोनही राजकीय बंधूंचे राजकीय बळ काय असेल ते निश्चित नसले तरी भविष्यातील राजकारणाच्या भितीने त्यांनी भाजपवर केलेली टिका त्यांच्या राजकीय अपरिपक्वपणाची ओळख करून देत आहे, असे राजकीय निरीक्षक मानतात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त त्रीवतेने सेना-मनसेचे नेते टिका करतात आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मात्र दुय्यम समजतात, असे चित्र निवडणूकीच्या प्रचारातून निर्माण झाले आहे.
