मुंडेंच्या अंत्यविधीला वेळ नव्हता पण सभांसाठी आहे; मोदींवर भुजबळांचा हल्लाबोल

chhagan-bhujbal
यवतमाळ- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मोदींवर घणाघाती टीका करीत ज्या गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर हाडाची काडे करून भाजपला महाराष्ट्राच्या कानाकोप-यात नेले त्याच मुंडेंच्या अपघाती मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या अंत्यसंस्काराला वेळ नव्हता. पण आता त्याच मोदींना आता बीडसह राज्यभर २५ सभा घ्यायला कसा वेळ मिळाला असा सवाल उपस्थित करीत केला.

छगन भुजबळ यांनी यवतमाळमध्ये चौफेर टोलेबाजी केली. भुजबळ यांनी नेहमीच्या शैलीत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भुजबळ म्हणाले, भारतीय जनता पक्ष अतिशय धोकादायक पक्ष आहे. या पक्षाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हा पक्ष फक्त उच्चवर्णियांचा आहे. ते सर्व समाजाला बरोबर घेत असल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. आता तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राज्यातील मंत्र्यांच्या यादीवर लक्ष घाला किंवा अमित शहांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी पाहा. यात बहुजन समाजाला कोठेही स्थान दिले नाही. ज्यांना स्थान दिले ते लोक चांगले आहेत त्याबद्दल तक्रार नाही. पण यांना बहुजन समाजाचे नेते दिसत नाहीत का?. भाजप हा बहुजन समाजाला सत्तेपासून वंचित ठेवणारा पक्ष आहे. आता सांगलीतील उदाहरण पाहा, तेथील धनगर समाजाचे नेते व विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे या बड्या नेत्याचे तिकीट भाजपने कापले. का कापले तर म्हणे शेंडगे यांनी मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तातडीने दिल्लीत मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.