
सिंधुदुर्गनगरी – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सिंधुदुर्गात आत्तापर्यंत आदर्श आचारसंहिता भंगाच्या नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेचे भंग करणार्या संबंधित राजकीय नेत्यांना प्रशासनातर्फे खुलासा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.
सिंधुदुर्गात आचारसंहिता भंगाच्या नऊ तक्रारी दाखल
ते पुढे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत नऊ राजकीय नेत्यांनी आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या राजकीय नेत्यांमध्ये कॉंग्रेस नेते नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, कॉंग्रेस युवा नेते नीतेश राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, सावंतवाडीचे सभापती प्रमोद सावंत या सात जणांनी मतदारांना प्रलोभने दाखविणारे जाहीर वक्तव्य केले. सुनील पेडणेकर यांनी दीपक केसरकर यांच्याविरोधात अंध व्यक्तींमार्फत पत्रकांचे वाटप केले तर प्रमोद जठार यांनी स्थानिक आमदार निधीतून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केल्याने आचारसंहिता भंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती देखील यावेळी खुटवड यांनी दिली.
