पंतप्रधान मोदींचे युतीबाबत मौन

modi5
बीड/औरंगाबाद – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंडेंच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक लढवणारी त्यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौर्‍याला बीडमधून सुरवात झाली. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर, मला महाराष्ट्रात येण्याची गरजही नव्हती, असे म्हणत मोदींनी मुंडेंच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मंचावर भाजपचे महाराष्ट्रातील नेते, महायुतीतील महादेव जानकर, विनायक मेटे, परळी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे, बीड जिल्ह्यातील भाजपचे सर्व उमेदवार, डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची २५ वर्षांपासूनची युती विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना तुटली. त्यावर मौन बाळगत मोदींनी भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, त्यांनी हा ‘भ्रष्टवादी पक्ष’ असल्याचे म्हटले. तर, काँग्रेसने गेल्या १५ वर्षांमध्ये फक्त मुख्यमंत्री बदलले त्याशिवाय काही केले नाही, असा घणाघात केला.

बीड मधील सभेनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत त्याची सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कारभारावर टीका करीत ते म्हणाले, ‘साठ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मात्र ते आमच्या ६० दिवसांच्या कारभाराचा हिशोब मागत आहेत.’

मोदी म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राचे भविष्य ठरविणारी आहे. कोण मुख्यमंत्री होणार – कोण नाही, यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, याचा तुम्ही विचार करा. महाराष्ट्राचे भाग्य कोण बदलेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. यावर जनतेतून ‘मोदी – मोदी’च्या घोषणा दिल्या गेल्या त्यानंतर त्यांनी, मी तुमचा सेवक आहे, असे म्हटले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, येथील नेते राजकीय अस्पृष्यता पाळतात.मोदींच्या सरकारी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सहभाग घेतला नव्हता, त्याचा उल्लेख न करता, येथील सरकार राजकीय अस्पृष्यता पाळते असा टोला त्यांनी हाणला.

प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कुटुंबांची बँक खाती उघडण्यात आली. काँग्रेसच्या काळात ज्या गरीबांसाठी बँकाचे राष्ट्रीयकरण झाले, ते गरीब साठ वर्षांमध्ये कधी बँकेत दिसले का, असा सवाल त्यांनी केला. शुन्य रकमेवर खाते उघडण्यात येणार असतानाही देशातील गरीब जनतेने बँकांमध्ये तीन हजार कोटी रुपये जमा केले. हे मोदी सरकारने करुन दाखवले, असे ते म्हणाले. बेरोजगारांसाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तरुणांना कौशल्यविकासासाठी केंद्र सरकार मदत करत असल्याचा त्यांनी दावा केला.