
नवी दिल्ली – लूप मोबाइल कंपनीकडून मुंबईतील ग्राहकांना देण्यात येणारी मोबाइल सेवा कधी बंद केली जाईल याबद्दलची निश्चित तारीख कंपनीने आपल्या ग्राहकांना पुढील दहा दिवसांत एसएमएस किंवा ई-मेलच्या माध्यमातून कळवावी, असा आदेश दूरसंचार नियामक संस्था ‘ट्राय’ने दिला आहे.
२९ नोव्हेंबरनंतर बंद होणार लूप मोबाइलची सेवा
मुंबई येथील लूप मोबाइल सेवा कंपनीचा परवाना नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यानंतर कंपनीला मोबाइलसेवा पुरवता येणार नाही. ही सेवा कायम ठेवण्यासाठी कंपनीला स्पेक्ट्रम विकत घेण्याची आवश्यकता होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात लूप कंपनी सहभागी झालेली नव्हती. यासंदर्भात व्यासायिक अडचणींमुळे परवान्याचे नूतनीकरण कंपनीला अजूनही करता आलेले नाही. त्यामुळे २९ नोव्हेंबर २०१४ नंतर ही सेवा बंद करावी लागणार असल्याचे लूप कंपनीने १० मार्च रोजी ट्रायला पत्र पाठवून स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात एअरटेल कंपनीने लूपशी ७०० कोटींचा करार करून कंपनी विकत घेण्याचा करार केला होता. मात्र, त्याला दूरसंचार विभागाने मान्यता दिलेली नाही. लूप कंपनीने ८०० कोटी रुपयांचे देणे थकवल्याने ही मान्यता दिली नसल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले आहे. हा करार पूर्ण न झाल्याने लूपच्या ग्राहकांना एअरटेलकडून सेवा पुरवली जाण्याची शक्यता नसल्यानेच ट्रायने लूप कंपनीला मोबाइल सेवेच्या भवितव्याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्याचा आदेश दिला आहे.
